Learn Robotics in Simple Steps – book published

रोबोटिक्सचे क्षेत्र हे अतिशय जलद गतीने आता व्यावसायिक रूप धारण करीत आहे, हि बाब अगदी शाळेपासूनच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील काही मोजक्या, रोमांचक आणि मनोरंजक विषयांपैकी रोबोटिक्स हा महत्वाचा विषय आहे. शिवाय रोबोटिक्समध्ये अभियांत्रिकी दृष्टीकोन फारच महत्वाचा मानला जातो. किंबहुना रोबोटिक्स हा अभियांत्रिकीचा एक अविभाज्य घटक आहे असे म्हणणे वावगे ठरू नये!

ह्या सर्व गोष्टींचा विचार करून अकोल्यातील रा.ल.तो.विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा.दत्तराज विद्यासागर ह्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांपासून इंजिनीरिंग आणि बी.एस्सी., एम.एस्सी. च्या विद्याथ्यांपर्यंत सर्वांना रोबोटिक्स सहजपणे शिकता यावे ह्यासाठी Learn Robotics in Easy Steps हे पुस्तक लिहिले आहे.

ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकोल्यातील रा.ल.तो.विज्ञान महाविद्यालयात दि. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी नुकताच पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन सौराष्ट्र विद्यापीठाचे, इलेक्ट्रोनिक्स विषयाचे तज्ञ व जेष्ठ प्राध्यापक डॉ. एच.एन.पंड्या ह्यांच्या हस्ते झाले. ह्या कार्यक्रमात बेरार जनरल एजुकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा, मानद सचिव अड. मोतीसिंग मोहता, श्री. मुकुंद जोशी आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.डी.नानोटी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Learn robotics in simple steps published

ह्या पुस्तकाला एम.आय.टी. पुण्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि ए.बी.यु. रोबोकॉन इंडियाचे संयोजक डॉ.मिलिंद पांडे तसेच फर्ग्युसन कॉलेज पुणे येथील इलेक्ट्रोनिक्स विभागाचे ज्येष्ठ प्रा.डॉ.जे.व्ही.खेडकर, आणि प्रा. हेमंत सातपुते ह्यांनी आपल्या प्रस्तावना देवून सन्मानित केले आहे.

ह्या पुस्तकाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्याला केवळ १५ दिवसात प्रारंभिक रोबोटिक्स शिकणे सहज शक्य आहे. त्यासाठी आवश्यक प्रात्याक्षिके, प्रोग्राम्स, वीडीओ इत्यादी पुस्तकासोबत असलेल्या सीडी मध्ये दिलेले आहेत. शाळा आणि कॉलेजातील अनेक विद्यार्थ्यांना प्रा.दत्तराज विद्यासागर ह्यांनी गेल्या दोन वर्षांपासून रोबोटिक्स सारखा क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या पद्धतीने, ह्याच पुस्तकातील अभ्यासक्रमाचा वापर करून शिकविला आहे. त्यांच्या ह्या सोप्या पद्धतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज पासून महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या शाळा, कॉलेज आणि खाजगी शिकवणी वर्गांमध्ये रोबोटिक्सचे १०० हून अधिक वर्कशॉप घेतले आहेत आणि विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकण्यासाठी प्रेरित केले आहे.

रोबोटिक्स उद्योग फार झपाट्याने एका विराट विश्वात रुपांतरीत होत आहे. ज्यामध्ये सहाय्यक कर्मचाऱ्यांपासून प्रोग्रामर्स, डीझाईनर्स, ऑपरेटर्स, टेस्टर्स, हार्डवेअर इंजीनिअर्स, ईलेक्ट्रोनिक्स इंजीनिअर्स, मेकानिकल इंजीनिअर्स, असे एक ना अनेक प्रकारच्या कुशल कर्मचाऱ्यांची गरज असते. रोबोट विकसित करून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या अभियांत्रिकी आणि सैद्धांतिक विज्ञानातील कुशल व्यक्तींना जबरदस्त मागणी आहे. अगदी प्राथमिक पातळीपासून रोबोटीक्सचा अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि ह्या आधुनिक काळात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तर प्रा.दत्तराज विद्यासागर ह्याच्या पुस्तकातून सहजरीत्या रोबोटिक्स शिकण्याची, मुख्यतः विदर्भातील विद्यार्थ्यांना, ही एक सुर्वणसंधी आहे.

त्यामुळे “काहीतरी वेगळे करून दाखवायचे” अशी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या क्षेत्रात अवश्य उतरावे असे प्रतिपादन प्रा. विद्यासागर ह्यांनी आवर्जून केले आहे.

प्रा.दत्तराज विद्यासागर ह्यांचा संपर्क इमेल: dsvakola@gmail.com

Newspaper Highlights

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.